बर्मगठिव्का - सांगली सातारी बोली

‘ बर्मगठिव्का ’

अलीकडेच सातार्ला ( साताऱ्याला )
जाण्याचा योग आला. इथेही मोबाईल
( इकडे शेल्फोन म्हणतात ) धारकांची
वाढती संख्या सहज नजरेत भरण्यासारखी
होती. ज्याला पाहावे त्याच्या मोबाईल
हाताला आणि हात कानाला. इथल्या
शेल्फोनधारकांच्या संभाषणात
‘ बर्मगठिव्का ’ आणि ‘ बर्मगठिव्तो ’ हे
दोन शब्द पुन : पुन्हा उच्चारले जात होते.
ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं
व्हायला आलं, मात्र ‘ बर्मगठिव्का ’ ही
काय भानगड आहे याचा मला काहीच
उलगडा होत नव्हता.
कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे
संभाषण अगदी जीवाचे कान करू न ऐकू
लागलो. यातून एक गोष्ट मात्र फायद्याची
ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या
संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या
देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला .
खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत
फेरफटका मारताना ‘ बर्मगठिव्का ’ चा
उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी
ऐकली त्यातले काही तुकडे जरी आपण
ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन
शब्दांची नक्कीच भर पडेल. तर ऐकूया
संभाषण -

क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला
सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय . कंचा
हाय तुजा ?

ख : माजा यार्टेल ( एअरटेल ). तुझा ?

क : माजा ब्येस्नेल ( बी . एस . एन . एल .)

( कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य
पर्याय आहेत . कौरेच , कौरेज , कव्रेज ,
करवेज आणि कर्वेजसुद्धा .)

ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान्
वडाफोनचंबी टावरं झाल्याती . आन् रिंज
( रेंज ) बी बरी घाव्ते.

क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये .

ख : हौ ऽऽ वडा वडाच. आर्पय्ला आरिंज
म्हंजी संत्र न्हव्तं का, मगं हुच (HUTCH)
झालं. आनात्ता वडाफोन .
आणखी बरंच काही संभाषण होत असतं .

त्यात अधूनमधून ‘ बर्मगठिव्का ’ व
‘ बर्मगठिव्तो ’ ही चालूच असतं .
हात्तिच्यामाय्ला ’, ‘ च्या माय्ला ’ आणि
‘ चॅआय्ला अशा ठराविक शब्दांचा योग्य
आणि अयोग्य ठिकाणी भरपूर वापर होत
असतो. बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ
मी लावू शकत होतो परंतु हे ‘ बर्मगठिव्का ’
माझी पाठ सोडत नव्हतं. शेवटी न राहवून
एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा
त्याला मुद्दामच विचारलं .

मी : हे ‘ बर्मगठिव्का ’ म्हंजे काय राव ?

नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला ,
‘ भायर्न आलाय दिस्तासा .’

मी : हो, मुंबईहून .

मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये त्याने
मला समजावलं...

‘ बर्मगठिव्का ’ म्हंजी ,
बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का . म्हंजी
फून ( फोन ) ठिवू ऽऽ क्काऽ ’

( हात्तिच्या मा .. माझ्या तोंडात आलंच होतं .
मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही .)

‘बर्मगठिव्का च्या ’ गुंत्यातून एकदाचा
मोकळा झालो. डोकं हलकं हलकं झालं.
इतका साधा सरळ शब्द मला कळला
कसा नाही !! I

लेखकाचे नाव माहित नाही
FORWARDED

1 टिप्पणी: